आपल्या नाजूक त्वचेला सांभाळा... छोट्या छोट्या चुका टाळा

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घेता येईल याविषयी याआधीही आपण जाणून घेतलं आहे.वेगवेगळ्या प्रकारच्या आणि पोताच्या त्वचेची काळजी,त्याविषयीच्या समस्या याबाबत आपण समजून घेतलेलं आहे. आज आपण या लेखात लक्षात घेणार आहोत काही छोट्या छोट्या चुका ज्या आपण टाळू शकलो तर आपल्या त्वचेची दैनंदिन काळजी घेणं तितकंसं अवघड जाणार नाही  आणि आपली त्वचाही टवटवीत राहील.

चला तर मग, थोडा शोध घेऊ या. आपल्याला किरकोळ वाटू शकतील पण तरी आपल्या त्वचेला इजा पोहोचवू शकतील अशा चुकांचा...

1) त्वचेची स्वच्छता योग्य प्रकारे न करणे..

आपल्या आंघोळीच्या वेळी साध्या साबणाने आपला चेहरा धुणे याला आपण चेहऱ्याची स्वच्छता असं म्हणू शकत नाही. त्यासाठी निगुतीने आपल्या दिवसाची सुरुवात करायला हवी. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर foaming face wash चा वापर तुम्ही जाणीवपूर्वक करायला हवा. जर त्वचा साधारण किंवा मिश्र स्वरूपाची असेल तर cream-based cleanser/foaming face wash चा वापर करणे आवश्यक आहे ज्यामुळे तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारायला मदत होईल.

दिवसाच्या शेवटी तुम्ही चेहऱ्यावर लावलेल्या सौंदर्य प्रसाधनांना काढून टाकण्यासाठी मिस्लर वॉटरचा उपयोग करणं खूप आवश्यक आहे. हे एक प्रकारचे शुद्ध खनिज युक्त पाणी असते जे खास करून तुमच्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठीच विशेषत्वाने तयार केले जाते. मेकअप करताना वापरल्या गेलेल्या प्रसाधनांचा दीर्घकालीन परिणाम चांगल्या पद्धतीने पुसून चेहऱ्याला चमक देणे आणि त्वचेला ओलावा देणे या गोष्टी यामुळे साध्य होतात. मेकअप पुसण्यासाठी केवळ साधा फेसवॉश वापरण्याऐवजी अशा प्रकारच्या साधनाचा वापर करणे कधीही उत्तम ! त्वचेची रंध्रे मोकळी आणि पूर्णतया स्वच्छ करणे आणि त्वचेला टवटवी मिळवून देणे यासाठी अशा प्रकारची काळजी घेणे तुमच्यासाठी योग्य ठरेल.

2) टोनरचा वापर टाळू नका

आणखी एक आवश्यक बाब म्हणजे टोनरचा उपयोग न टाळणे.त्वचेवरील रंध्रे बंद करणे ही रोजच्या त्वचेच्या काळजीत एक महत्वाची गोष्ट आहे. टोनरचा वापर केल्याने त्वचेच्या पृष्ठभागावरील तेलकटपणा कमी होतो. त्यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरुमे, फोड, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स यापासून आपण आपल्या त्वचेचा बचाव करू शकतो. टोनरमधे वापरल्या जात असलेल्या गुलाबपाणी, औषधी तेले यामुळे त्वचेची रंध्रे कमी होतात किंवा आकसून जातात ज्याचा परिणाम म्हणून त्वचा टवटवीत आणि तजेलदार व्हायला मदत होते.

तुम्हाला जर टोनर विकत घ्यायचा नसेल किंवा वापरायचा नसेल तर गुलाबपाणी वापरणे हा पर्याय तुम्ही निवडू शकता. दिवसाच्या शेवटी मेकअप पुसल्यानंतर गुलाबपाण्याचे काही थेंब कापसावर घेऊन त्याने चेहरा आणि मान हलकेच पुसून घ्या. यामुळे त्वचा मुलायम आणि टवटवीत होईल.

3) अति घर्षण टाळणे

त्वचा ही खरखरीत वस्तू नाही की जिला आपण जास्त प्रमाणात चोळत राहू... योग्य प्रकारचा face scrub वापरणे हे आपण शिकायला हवं. चांगल्या प्रतीच्या सक्रबच्या वापरामुळे त्वचेची रंध्रे अगदी मुळापर्यंत खोल स्वच्छ होतात ज्यामुळे त्वचेतून बाहेर येणारे तेल रोखणे शक्य होते. पण यासाठी त्वचेला हानी पोहोचेल इतक्या अधिक प्रमाणात त्वचा चोळून चोळून स्वच्छ करण्याचा मोह टाळा. असे केल्याने त्वचेवरील अल्कलाईनचा थर निघून जातो आणि त्वचा कोरडी, खरखरीत होऊ शकते. तुमच्या त्वचेचा पोत लक्षात घेवून त्यानुसार आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे स्क्रबींग पुरेसे ठरू शकेल. तेलकट त्वचेला आठवड्यातून दोनदा आणि कोरड्या त्वचेला आठवड्यातून एकदा या पद्धतीने स्वच्छ करणे फायदेशीर ठरेल. लक्षात असू द्या... ही त्वचेच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे ती टाळू नका पण संयमित आणि योग्य प्रमाणात तिचा वापर करा.

4) योग्य Moisturizer चा वापर न करणे.

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि कोरडेपणा दीर्घकाळ नियंत्रणात ठेवायचा असेल तर त्यासाठी योग्य Moisturizer निवडणे आणि त्याचा वापर करणे महत्वाचे आहे. तुमची त्वचा तळकट असेल तर तुम्हाला सौम्य स्वरूपाचं क्रीम किंवा जेल असलेलं Moisturizer उपयुक्त ठरेल.यामुळे तुमच्या त्वचेच्या रंध्रांना इजाही होणार नाही आणि त्वचा स्वच्छही होईल. Moisturizer खरेदी करताना तुमच्या त्वचेला उपयुक्त असलेला प्रकार कोणता आहे हे काळजीपूर्वक नीट समजून घ्या आणि मगच योग्य Moisturize खरेदी करा.तुमची त्वचा जर कोरडी असेल तर ओलावा देणारे आणि त्वचेमध्ये शोषले जाऊ शकेल अशा प्रकारचे तैलीय द्रव्य असलेले Moisturizer वापरणे तुम्हाला योग्य ठरेल. humectants, emollients, and occlusives यांचे योग्य संमिश्रण असलेले Moisturizer वापरणे कधीही स्वागतार्ह ठरेल. या विषयावर आम्ही मार्गदर्शन केले आहे जे पुढील लिंकवर वाचायला उपलब्ध आहे.

5) Sunscreen चा वापर न करणे

कोणत्याही प्रकारचे वातावरण असो किंवा ऋतू कोणताही असो.... 30 Sun Protection Factor (SPF) असलेले सनस्क्रीन तुम्ही वापरा. तुम्ही स्वतःच स्वतःला हे समजवा की बाहेर ऊन आहे, पाऊस आहे की थंडी आहे हे महत्वाचं नसून माझी त्वचा सूर्यकिरणांपासून सांभाळणे हे माझं कर्तव्यच आहे, कारण कोणत्याही बाह्य वातावरणात UVA and UVB हे घटक त्वचेला इजा पोहोचवू शकतात हे विसरू नका... त्याआधी ते नीट समजून घ्या.. चार भिंतीच्या आत वावरताना देखील सनस्क्रीनचा वापर महत्वाचा आहे. बाहेर ऊन असताना घराबाहेर पडण्यापूर्वी किमान एक तास तरी आधी तुम्ही चेहऱ्याला आणि हातला सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे.

6) वैविध्यपूर्ण सौंदर्य उत्पादने वापरून पाहणे…

आपल्या त्वचेचे आरोग्य वाढावे यासाठी आपल्याला पोषक अशा प्रसाधन उत्पादनांचा शोध घेणं आवश्यक आहे पण त्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा अति वापर करून पाहणं टाळायला हवं. असे केल्याने तुमची त्वचा खराब होईल आणि अपेक्षित परिणाम दिसून येणार नाही. आपल्या त्वचेचे आरोग्य सांभाळणारे योग्य उत्पादन सापडले की त्याचाच वापर सातत्याने करायला हवा.कोणतेही सौंदर्य प्रसाधन एका रात्रीत आपला चेहरा सुंदर करू शकणार नाही. त्यासाठी संयम आणि सातत्य तुम्ही ठेवलं पाहिजे. तरच तुम्ही त्या उत्पादनाची किमया अनुभवू शकाल...

सौंदर्य प्रसाधने अतिरिक्त वापरून त्यांची अनावश्यक पुटे चेहऱ्यावर चढवत राहणे याचा मोह कटाक्षाने टाळाच. त्यातील विविध रसायने, औषधे यांचे थर एकावर एक एकत्र झाल्याने त्वचा खराब होण्याची शक्यता असते..माध्यमांवर दिसणाऱ्या आकर्षक नव्हे चित्ताकर्षक प्रसाधन उत्पादनांच्या माऱ्यला बळी पडून प्रत्येकवेळी नवे प्रसाधन उत्पादन वापरणे योग्य नाही याचे भान ठेवा .. कारण तुमचा चेहरा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे... त्याला सांभाळा.

7) रासायनिक उत्पादनांचा वापर टाळणे

तात्पुरत्या स्वरूपाचे परिणाम दाखविणारी प्रसाधने वापरणे हानिकारक ठरू शकते. चटकन परिणाम दिसावा यासाठी या प्रसाधनात रासायनिक द्रव्ये वापरली जातात जी त्वचेला इजा पोहचवितात.SLS or Sodium Lauryl Sulfate यासारखी गंधक वापरलेली प्रसाधने वापरल्याने त्वचेवर चट्टे उठणे, पुरळ येणे असे दुष्परिणाम दिसून येतात. अशा द्रव्यांमुळे त्वचेवरील नैसर्गिक तैलीय ग्रंथी खराब होवू शकतात. डोक्यात खाज येणे , eczema असे आजार पण यातून उद्भवू शकतात.

आपल्या नकळत काही प्रसाधने आपल्या शारीरिक अवयवांना इजा पोहोचवू शकतात याची आपल्याला कल्पना नसते. हार्मोन्स चे असंतुलन या रासायनिक द्रव्यांमुळे घडते ज्यातून स्तनाचे विविध गंभीर आजार उद्भवू शकतात. अशा रसायनांच्या वापरामुळे जननसंस्थेशी संबंधित गंभीर रोगांना आमंत्रणच मिळते... याची दखल घेणे आवश्यकच आहे. phthalates सारख्या रासायनिक द्रव्याचा वापर मूत्रपिंड, मूत्राशय,फुफ्फुसे यांच्या कार्यावर परिणाम करते.

नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने तयार करणारे अनेक उत्पादक असा दावा करतात की त्यांच्या उत्पादनात कोणतेही रासायनिक द्रव्य वापरलेले नाही. परंतु TEA, silicons, TEA, and PEG यासारखी उत्पादने वापरणेही आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते त्यामुळे आधी स्वतः;चे आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे कारण म्हणतात ना.... सिर सलामत तो पगडी पचास

8) बिछान्यावरील चादर, अभ्रे यांची स्वच्छता आणि बदल…

चटकन लक्षात न येणारी अशी महत्वाची चूक म्हणाजे दिवसाच्या शेवटी सुंदर स्वप्नील प्रदेशात नेणाऱ्या बिछान्याची काळजी…

दिवसभर दमल्यावर उशीवर डोके ठेवून आपण झोपी जातो... उशी तीच असते पण तिच्या अभ्र्यावर दररोज वेगवेगळे जंतू परत असतात... असे अभ्रे, चादरी आपल्या नाजूक त्वचेच्या संपर्कात रोजच रात्री बराच काळ येतात आणि आपल्या त्वचेला हानी पोहचवितात... त्यासाठी रोज रात्री धुतलेल्या चादरी, अभ्रे यांचा वापर करणे आवश्यक आहे. आपला घाम , आपल्या अंगावरील धूळ, तेल या सर्वाचा संपर्क येऊन या वस्तु खराब होतात आणि त्या अशुद्धीचे कण पुन्हा आपल्याच त्वचेला चिकटतात हे आपल्या लक्षातच येत नाही.

9) अस्वच्छ मेकअप साधनांचा वापर

आपल्या त्वचेवर मेकअप करताना आपण वेगवेगळे ब्रश, स्पंज यांचा वापर करतो. या साधनांची स्वच्छता राखायला हवी. पुन्हा पुन्हा तेच ब्रश वापरणे त्वचेला घातक ठरू शकते. क्रीम बेस किंवा वॉटर बेस मेकअप करताना त्यातील कण ब्रश किंवा स्पंज मधे अडकून राहतात, चिकटून बसतात. आपण तेच नेहमी आपल्या त्वचेवर फिरवत राहतो त्यामुळे त्यातील धूळ, घाण ही सुद्धा त्वचेवर पसरत जाते. अशी साधने उघड्यावर ठेवल्याने ती धुळीच्या संपर्कात येत राहतात. त्यामुळे ब्रश, स्पंज यांची वारंवार स्वच्छता करणे आणि वापरात नसताना ती व्यवस्थित बंद करून ठेवणे ही कामे महत्वाची आहेत.

हे वाचून तुम्हाला लक्षात आलं असेलच की या छोट्या आणि सोप्या युक्त्या वापरून आपण आपली त्वचा छानपैकी सांभाळू शकतो. तुम्ही जर असे प्रयोग नव्यानेच करून पाहत असाल तर छोटी छोटी पावले टाकणे योग्य... आपल्या त्वचेला या सवयी पोषक अशा cleanser, toner, & moisturize चा वापर सुरुवातीला करून पहा. Exfoliater चां आठवड्यातून एकदा वापर करा. ही बहिरंगाची काळजी तर तुम्ही घ्यायलाच हवी पण त्याजोडीने शरीर मन बुद्धी प्रसन्न राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे,शरीराला आवश्यक तेवढे पाणी पिणे,आणि सकस आणि संतुलित आहार घेणे यासाठीही अवश्य वेळ द्या. दीर्घकाळ सलग या सवयी तुम्ही लावून घेतल्यात तर तुमची त्वचा आरोग्यपूर्ण आणि तजेलदार राहील याची खात्री बाळगा.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कळवायला विसरू नका....

TAGS: